Tuesday, March 14, 2023

आजोबा .....आप्पा


                आप्पा....... २० फेब्रुवारी २०२३  रोजी आमच्यातून गेले . ते गेले खरे पण आठवणी अजून ओसरल्या नाहीत . २ मुले , पत्नी , ६ मुली आणि अर्थातच या सगळ्यातून तयार झालेली नात्यांची समृद्धता सर्व सोडून गेले . वयाच्या ३३ व्या वर्षापर्यंत मी स्वतःला फार समृद्ध मानत आले कारण मला आई आणि वडील या दोन्हीकडील आजी आणि आजोबा ह्या नात्यांचे प्रेम प्राप्त झाले . पण आज या नात्यातला एक मोती निसटला आणि माझी समृद्धी कमी झाली . माणूस कधीतरी जाणारच की !    पण स्वीकारायला वेळ  लागतो . आम्ही सगळे सावरलो आता आपापल्या संसारात  , मुला बाळात मग्न झालो . पण आजी आतून तुटली .  ७० वर्षे आपण ज्यांच्याबरोबर आयुष्य  घालवलं ती सोबत आता होणे नाही , हे तिला स्वीकारायला वेळ लागेल . वेळ सर्वच दुखांवर च औषध पण त्यासाठी संयम हवा . या वयात ती इतका संयम कुठून आणणार ? त्यांची २ मुले , ६ मुली , सूना ,२९ नातवंडे ५० ते ५५ पत्वांडे तिला यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करू. 

                 पंचक्रोशीत मोठ नाव असल्याने १० दिवस सतत कोण ना कोण भेट घेण्यास येत होते .  शेजारच्या काही गावातील सरपंच , आमदार बबनदादा शिंदे यांचे चिरंजीव रंजीत दादा , पंढरपूरच्या कारखान्याचे चेअरमन आणि तेथीलच लोकप्रिय इंजिीअरिंग कॉलेज चे प्राचार्य , आणि इतर . तसेच त्यांच्या सर्व विधी ला खूप जास्त संख्येने जनसमुदाय उपस्थित होता . त्यांचा राजकीय कार्यात जास्त सहभाग होता . त्यामुळे या लोकांमध्ये त्यांच्याबद्दल वेगळा आदर होता . त्यांना डी. जी. आप्पा या लोकप्रिय नावाने ओळखत असत . 

                   मला त्यांच्यासोबत चे काही प्रसंग सांगावेसे वाटतात . आपण जेव्हा लहान असतो तेव्हा , आपल्याला वळण लागण्यासाठी आपले आई वडील मार द्यायचे त्या मारातन सुटका करतील फक्त दोनच व्यक्ती आजी किंवा आजोबा .  मला एक प्रसंग कायम लक्षात राहणारा आहे  . आणि त्या प्रसंगाची त्यांच्या मृत्युच्या आदल्या दिवशी आठवण होऊन मी तो संजय सोबत शेअर केला . तो असा.... मी ,  अमृत आणि पल्लवी ... एका उन्हाळ्याच्या सुट्टीत आप्पा आम्हाला लग्नाला घेऊन गेले . ते गाव  अतिशय आडवळनी असल्याने त्या गावाला जाण्यासाठी एकच एसटी होती . त्या एसटीची वाट पाहत त्या काळात बस स्टँड वर उभा राहणे हे एक तप च होत आमच्यासाठी . त्या बस स्टँड वर एक कंडक्टर जवळपास १ तास झाला तरी एकाच एसटी च नाव सुरात पुकारत होता वडाची वाडी - उपळाई - माढा. मग काय आमचा खेळ सुरू झाला आम्ही एका सुरात तिघांनी तोच ताल धरला आणि घरी पोहचलो तरी सुद्धा हाच खेळ सुरू . आजही या तीन गावांची नाव ऐकली की हा प्रसंग आहे असा डोळ्यासमोर उभा राहतो . मग जेव्हा बस भेटली तेव्हा आम्ही त्या लग्नाच्या गावी पोहचलो,  मग काय उतरल्यावर समजलं की आता एक भलामोठा चढ चढून आम्हाला लग्नस्थळी पोहचायचे होते . ते ही अंतर कापलं आणि पोहचलो .आजही आहे असा तो लग्न समारंभ डोळ्यासमोर आहे . आजोबांना त्यांच्या नातवंडांना  कुठे घेऊन जायचं असेल की ते कितीही त्रास सहन करायला तयार होतात. 

                      असाच एक प्रसंग अमर भैय्या (न्या. अमरजीत जाधव ) ने आमच्यासोबत शेअर केला होता . तो घरातला पहिला मुलगा त्यामुळे जास्त लाडका . गावात कोणा एकाच लग्न जमवण्यासाठी आप्पा ना बोलावणं आल . त्या काळी पायी जायचं पण तरी सुद्धा भैय्या ला घेऊन जायचं . मग त्यांनी त्यांच्यासोबत दोन माणसे घेतली , त्यांच  काम फक्त भैय्या ला खांद्यावर घेणं होत . असे आजोबा असतील तर ते कधी जावे वाटतील का ? हाच  त्यांचा नातू न्यायाधीश झाला  तेव्हा त्यांच्या हस्ते  बोलावलेल्या प्रमुख पाहुण्यांसमोर त्यांनी त्यांच्या नातवाचा सत्कार केला होता . 

                      आम्हा सर्व नातवंडांना घेऊन ६ ते ७ वर्ष पंढरपूर येथे शिक्षणासाठी आमच्यासोबत राहिले . तेव्हाचे काही प्रसंग आठवतात . एक्साम असली की मी जेव्हा त्यांना जागरण करते असं वाटायचं तेव्हा ते उठून विचारायचे ....... किती वाजले आता ? झोपाव , उद्या  करावं राहिलेलं .  मला एकदा पंढरपूर वरून कोल्हापूर ला जाणाऱ्या एसटी त एक आजोबा भेटले . असेच ते गप्पा मारत होते आणि मला म्हणाले. .... बाळ ,   तू  कोणत्या गावची  ? मी म्हणाले जळोली . मग त्यांनी  मला  नाव विचारले मी म्हणाले आरती जाधव . मग ते बोलले ज्ञाना आप्पा ला ओळखते  का ? मी म्हणाले हो मी त्यांची नात . यावरून च लक्षात येते त्यांची व्याप्ती  ह्या आणि अजून खूप साऱ्या आठवणी आहेत . छोटे छोटे प्रसंग आहेत माझ्यासोबत च शौर्य ला ही त्यांचे आशीर्वाद आणि सहवास लाभला याचे  सौख्य आहे . असे होते आमचे आजोबा स्वतः ही खूप समृद्ध् आयुष्य जगले , खूप माणसे जोडली व आमच्यासाठी ही ठेव ठेऊन गेले 😢😢

             भारतीय संस्कृतीत जोडीदार गेला की हयात स्त्रीला आपले आभूषणे घालता येत नाहीत . तिला विधवा म्हणून यातून बाजूला केले जाते.   आप्पांच्या जाण्याने हे सर्व प्रसंग फार जवळून अनुभवले आणि वाईट वाटले , असल्या संस्कृती ची चीड ही आली . आक्का चा   तो आवाज आजही कानी येतो जेव्हा तिचे जोडवे , मंगळसुत्र, बांगड्या ही सुवासिनी ची लेणी आप्पांच्या राखेत टाकायचे होते आणि काहींनी ती पुढे होऊन काढून घेतली .  आधीच जोडीदाराच्या जाण्याने खचलेली स्त्री हे सर्व  कस सहन करत असेल ? जिला जास्त आधाराची गरज असते तिला अशा पद्धतीने खचवले जाते . पण काही उपयोग नाही जिथे महात्मा फुले हरले तिथे आम्ही कोण ? आज्जीच पांढर कपाळ बघायची सवय करून घ्यायची .  


                                                   🌸🙏श्रद्धांजली🙏🌸

                                                 कै. ज्ञानोबा जिजाबा जाधव 

आप्पांची नात आरती

@Copyright claim  copy with name

mpsc.aratigawali@gmail.com

Thursday, March 9, 2023

जागृती काळाची गरज महिला दिन विशेष

                  महिला दिनाला एक शतका पेक्षा जास्त इतिहास आहे. १९०८ साली दक्षिण अमेरिकेतील काही महिलांनी मतदानाचा हक्क , कामाचे तास , वेतन या साठी  एकत्र येऊन निदर्शने केली होती . यानंतर अमेरिकेतील राजकीय पक्षांनी २८  फेब्रुवारी महिला दिन म्हणून साजरा केला . पहिल्या महायुद्धा दरम्यान  रशियन महिलांनी  8 मार्च हा महिला दिन म्हणून साजरा केला तेव्हा पासून ८ मार्च  हा महिला दिन म्हणून साजरा केला जातो . संयुक्त राष्ट्रसंघाने १९७५ पासून महिला दिन साजरा करण्यास सुरुवात केली . १९९२ पासून UN  ने महिला दिन हा थीम आधारित साजरा करण्यास सुरुवात केली. हा झाला महिला दिनाचा राजकीय इतिहास. 

                    महिला दिनाचा सामाजिक इतिहास वेगळा आहे , कारण राजकीय दृष्टया समाजाला दिलेली कोणतीच देणगी जशीच्या तशी समाजात रुजत नाही  .ज्या अमेरिकन महिलांच्या पुढाकाराने महिला दिन सुरू झाला त्याच अमेरिकेत आजही  महिला आणि पुरुषांना समान वेतन नाही , तिथे इतर देशांची काय कथा ?  समाज स्त्री कडे दुय्यम म्हणून पाहत आला आणि आजही तो तसाच पाहतो. आता तुम्ही म्हणाल असं कसं म्हणून चालेल ?  आपण केवढे बदल आत्मसात करून घेतलेत. स्त्री दिवसेंदिवस प्रगती करत आहे . पण ती एका चौकटीत आहे मैत्रिणींनो. कसे ते तुम्हीच पाहा. काही दिवसांपूर्वीचे उदाहरण घेऊ.  माननीय द्रौपदी मुर्मु देशाच्या सर्वोच्च पदावर विराजमान झाल्या, म्हणून तुम्ही असे म्हणाल का  की आता आदिवासी महिला पुढील काळात समस्यामुक्त होऊन जगेल .याचाच अर्थ भारतात शेवटच्या घटकापर्यंत विकास साधलेला नाही .  WEF (world economic forum) च्या एका ताज्या अहवालनुसार भारतात स्त्री -पुरुष समानता येण्यासाठी १३२ वर्ष लागतील .मग १३२ वर्ष नुसते स्टेटस ठेऊन महिला दीन साजरे करत बसायचे का ? या प्रश्नांना उत्तरे आहेत आणि ती आपल्याच हातात आहेत की हे १३२ वर्ष कमी कसे होतील . 

                      आज स्कॅनडेनेवियन (५ देशांचा समूह) देशात आणि अनेक पुढारलेल्या पश्चिमेकडील देशात महिलांना मासिक पाळीत ४ दिवसांची पगारी रजा मंजूर आहे. २०२३ मध्ये आपल्या सुप्रीम कोर्टाने अशीच एक  PIL फेटाळली,  सुप्रीम कोर्टा च्या मते अशा प्रकारे रजा मंजूर केल्यास महिलांना नोकरीवर ठेवताना त्यांना ठेवायचे की नाही यावरून भेदभाव होईल जे आपल्या घटनेला अपेक्षित नाही. तसेच २०२२ च्याच एका केस मध्ये सुप्रीम कोर्टाने काही निकाल दिले त्यामध्ये वडिलांच्या संपत्तीत मुलींना समान हक्क , अविवाहीत मुलींना विशिष्ट कालावधी उलटून गेल्यावर अबॉर्शन करण्याचा हक्क , २०१९ साली ट्रीपल तलाक. हे सर्व निर्णय स्वागतार्ह आहेत पण ते वेळीच होऊ शकले नाहीत  याची खंत आहे  . 

                       महिलांचा मंदिर प्रवेश हा मुद्दा आजही गाजतो आहे . केरळ मधील शबरिमाला मंदिर प्रवेशा संदर्भात धार्मिक हस्तक्षेपामुळे सुप्रीम कोर्टाकडून स्थागिती देण्यात आली. यासारख्या अनेक धार्मिक बाबीत महिलांना प्रवेश नाकारला जातो. महिलांना स्वातंत्र्य द्या ही गोष्ट मागावी का लागत आहे  ? की याचा आम्हाला विसर पडला आहे , १०डिसेंबर  १९४८ हा तो दिवस आहे ज्या दिवशी संयुक्त राष्ट्रांनी मानवी हक्कांचा जाहीरनामा स्वीकारला. ज्याच्या कलम २ नुसार प्रत्येक व्यक्ती जन्मतः स्वतंत्र आहे आणि कलम १२ नुसार त्या व्यक्तीला स्वतःचं जीवन स्वतःच्या पद्धतीने जगण्याचा हक्क आहे .मग आम्हाला ७५ वर्ष होऊनही प्रत्येक गोष्ट विचारावी का लागते ?  मंदिरात प्रवेश करण्यासाठी कोणत्याही साधू , महंताला का विचारायचे आहे ? तुम्ही सर्व गोष्टी आहे अशा स्वीकारता म्हणून समाज जास्त बळकट होऊन तुमच्यावर अन्याय करत राहतो . कारण ना तुम्हाला मानवी हक्कांचा जाहीरनामा माहीत आहे ना तुम्हाला घटनेने दिलेले मूलभूत हक्क माहित आहेत ! एखाद्या सणाप्रमाने महिला  दिन साजरा करायचा ,छान  स्टेटस ठेवायचे. पुन्हा आहे तशी जिंदगी सुरु. मग नेक्स्ट महिला दिन अशी अनेक वर्षे लोटली.  

                      काही महिलांना  मी चुकीच बोलत आहे असंही वाटू शकतं , कारण त्यांनी स्त्री स्वातंत्र्याचा चुकीचा अर्थबोध घेतलेला असतो. काही प्रमाणात तो असा असतो की त्यांना स्वतःला त्या ज्या घरात राहिल्या , वाढल्या आणि ज्या घरात नांदत आहेत तिथे त्यांना काही प्रमाणात सुट मिळते जसे की हवी ती कपडे घाला,  शॉपिंग, फिरणे आणि बऱ्याच गोष्टी . तर मैत्रिणींनो थोड थांबा , पहिली गोष्ट म्हणजे महिला दिन हा जागतिक पातळीवर चा आहे आपल्या घरापुरता मर्यादित नाही , दूसरी गोष्ट म्हणजे जेंडर गॅप कमी करणे हे दुसरं उद्दिष्ट आहे जे अजून साध्य होण्यास १३२ वर्ष लागणार आहेत , आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे वुमन एम्पॉवरमेंट म्हणजे पाहिजे ते कपडे घालणं वगैरे नसून ते स्त्रियांचा रोजच्या इकॉनॉमिक हालचालींमध्ये असलेला सहभाग आहे . आर्थिक घडामोडींमध्ये स्त्रियांचा सहभाग हा मानव विकास अहवालातील एक आयाम असून त्यामध्ये आपण खूप मागे आहोत असे संयुक राष्ट्राचे मत आहे तसेच शाश्वत विकास या संयुक्त राष्ट्राच्या २०१२ मधील १७ उद्दिष्टांपैकी १ उद्दिष्टं लैंगिक समानता हे आहे , जी आपणास २०३० पर्यंत साध्य करणे आहे.   

                      जेंडरगॅप चा विचार केल्यास भारतामध्ये  १००० मुलांमागे ९२९ मुली आहेत . महाराष्ट्रात २०११ च्या  जनगणनेनुसार बाल लिंग गुणोत्तराचा विचार केल्यास १००० बालकांमागे ८६१ बालिका आहेत . ही तफावत फार मोठी आहे . आताच आपण सोलापूर जिल्ह्यात नवरदेवाचा जो मोर्चा पहिला तो या आधी निर्माण झालेल्या लिंग गुणोत्तराच्याच फरकाचा परिणाम होता. २००८ पासून संसदेत महिलांना राजकीय आरक्षण ५०% असावे हे विधेयक प्रलंबीत आहे . स्थानिक स्वराज्य संस्थेत 50%आरक्षण मंजूर केले पण बायको निवडून येते आणि नवरा कारभार पाहतो अशी त्या आरक्षणची गत आहे . 

                      हे झाले सर्व स्त्री वर अन्याय होतो वगैरे . नाण्याच्या २ बाजू नेहमी तपासाव्या म्हणतात तस ,  पुरुषांवर स्त्री कडून अन्याय होण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे असे वर्तमापत्राद्वारे वाचनात आले होते .पण हे सहजासहजी पटत नाही , एक बातमी अशी देखील वाचनात आली की बिहार राज्यात पत्नी आणि आई च्या भांडणाला कंटाळून एका जिल्हाधिकाऱ्यांनी आत्महत्या  केली . IPC कलम ४९७ हा व्याभिचाराचा गुन्हा सिद्ध झाल्यास फक्त पुरुषाला सजा होत असे आणि  याचा फायदा घेत कित्येक स्त्रियांनी सुद्धा ४९७ चा गैरवापर केला आहे . त्याप्रमाणेच कलम ४९८अ ज्यानुसार महिलेचा मानसिक व शारीरिक छळ करण्यात आल्यास सासरच्या मंडळींना अटक करण्यात येत असे या कलमाचा सुद्धा सुप्रीम कोर्टाच्या इतिहासात खुप गैरवापर केला गेला. अगदी ताजी बातमी २०२२ ची आहे . अशावेळी तुम्ही काय म्हणाल ? 

                          मी माझ्या जवळच्या पुरूष नातेवाईकांना जेव्हा विचारते की स्त्री स्वातंत्र्य ,  स्त्री - पुरूष समानता यावर त्यांची काय मत आहेत ?  तर बऱ्याचदा त्यांची ही उत्तर आहेत की स्त्री स्वाभाविक रित्या भावनिक असल्याने बऱ्याचदा अमिषाला बळी पडणे , फसवले जाणे , सायबर क्राईम, या गोष्टी ओळखू शकतं नाही . काही वेळा  ओळखून सुद्धा वाहवत जाते , ठामपणाचा अभाव , शिक्षणाचा अभाव , नात्यांमध्ये सूडबुद्धी ने वागणे या गोष्टींमुळे स्वतःची प्रगती स्वतःचं खुंटवण्यास कारणीभूत ठरते.  इथेच मेख आहे १३२ वर्ष कमी करण्याची पुरूष मंडळी नी महिलांबाबत बनवून ठेवलेली मत खोडून काढता आली पाहिजेत . त्यासाठी एकमेकींचा आदर करायला शिका . सासु - नणंद ही नाती मैत्रीच्या दर्जावर आणण्याचा प्रयत्न करा . ठाम बना पटकन विश्वास ठेवणे बंद करा. स्वतःमध्ये बदल घडवण्याची धडपड चालू ठेवा 

                         शेवटी स्त्री एक शक्ति आहे तिने त्या शक्ति चा चांगला वापर केला तर वामनराव पै म्हणतात तसे घराचा स्वर्ग बनवते आणि सूडबुद्धीने वागली तर  त्याचं घराची राखरांगोळी करते . संपूर्ण पुरूषी पद्धतिने वागणे म्हणजे स्त्री स्वांतत्र्य नाही तर व. पू काळे म्हणतात तसे निसर्गाने स्त्री आणि पुरुष हे दोन वेगळे घटक निर्माण केले आहेत . त्यांच्याकडून निसर्गाला जस अपेक्षित आहे तसे त्यांनी वर्तन करावे . स्त्री आणि पुरुषाला त्यांची त्यांची शक्ति निसर्गाने प्रदान केेली आहे त्याचा प्रत्येकाने योग्य वापर करावा. 

शेवटी Nothing is perfect in life but atleast try to go near about perfect

            mpsc.aratigawali@gmail.com

आरती गवळी

Copy with name  @copyright claim 

                      

                     

                   

Tuesday, June 29, 2021

मी गप्प का ?

        संक्रांतीचा सण झाला तेव्हा मी पहिल्यांदाच  या सणाला गावी होते.  सणाच्या आधी नटाफटा करण्यात व्यस्त असतो आपण . मी पण सगळं व्यवस्थित पार पडावं याच अपेक्षेत होते . तस ते पार पडलं सुद्धा.  पण एक मनाला,  विचाराला न पटणारी बातमी कळली आणि तेव्हाच मनापासून वाटले महात्मा फुले गप्प बसले असते तर ..... ? आंबेडकर गप्प बसले असते तर .....?

           आता संक्रांतीचा दिवस उजाडला आणि आम्ही नटून थटून मंदिरात गेलो.  सर्व स्त्रियांच्या भेटीगाठी हळदी कुंकू झाले.  आम्ही मंदिरातून निघण्याच्या तयारीत होतो एवढ्यात बायका कुजबुज करीत आहेत असे ऐकून ... मी विचारले काय झाले?  तिकडून उत्तर आले . खालच्या जातीतील (SC)बायका येतील आता त्यांच्याकडून हळदी कुंकू लावू नये आणि मंदिरात त्यांनी रुक्मिणी ला वाहिलेले चुडे घेऊ नयेत.  त्यासाठी ते पुजारी आधीपासून जमलेले चुडे वेगळीकडे काढू लागले.  प्रश्न हा होता कुठे आहे कलम 17 , काय काम आहे 1955 च्या अस्पृश्यता निवारण कायद्याचे   ? फुले,  आंबेडकर,  शाहू कुठे कमी पडले ? आयुष्य पणाला लावले ?   तरी....... अशा परिस्थितीत फक्त महापुरुषांचे स्मरण होते आणि किती कष्ट वेचले त्यांनी समाजात समानता रूजवणयासाठी पण समाज ही त्यांना ताठपणे जगू देत नाही ..... आणि मुळात अन्याय सहन करत जगणे या लोकांनी अंगी पाडुन घेतल्याने...समाज अन्याय करत राहिला  ....

खरा प्रश्न तर हा आहे की त्या स्त्रिया रूक्मिणी ला हळदी कुंकू लावू शकतात तर तुम्ही कोण रूक्मिणी पेक्षा अशा किती महान आहात याचा जरा विचार करा . 

..................  शोकांतिका

😌😌😌😌

              

 

             

Sunday, December 20, 2020

कधी वाटते.....🕊🕊🕊

 कधी वाटते..... व्हावे जिजाऊ,  

फिरवून संस्कारांची तलवार 🗡🗡🗡

घडवावा पुन्हा एक शिवाजी.....🔥🔥

🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟

                          कधी वाटते.... व्हावे फुलेंची सावित्रीबाई ,                              

                           प्रत्येक बालिकेला  मिळावी लेखणी..✒✒

                            भविष्य घडविणारी .... 📚📚📚

🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟

       कधी वाटते.... व्हावे .....

       कर्मवीर भाऊरावांची लक्ष्मीबाई  , 

       पतीच्या स्वप्नांपुढे जिथे..... 🌳🌳

        सोन्यालाही मोल नाही....🌟🌟 

       🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟

                         स्त्री जन्म व्यर्थ  नाही ग.... सख्यांनो 

                           आजच जागवा तुमच्यातल्या.... 

                            जिजाऊ,  सावित्रीबाई,  लक्ष्मीबाई,  

                            सारख्याच  नव विचारांना.....

🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟

    

               

                            



                                         

                           


Friday, October 30, 2020

पूर्ण अपुर्ण ...⚪⚫⚪⚫

      चला.... चला.... चंद्रदर्शना ची वेळ झाली ,  दुध घेतल का ? मी आलेच , तुम्ही व्हा पुढे अशी काहीशी एकसारखीच लगबग आज सर्वत्र सुरू असेल... त्यात आज अजून एक पर्वणी म्हणजे "ब्लू मून " .... त्यामुळे यावेळची कोजागिरी पोर्णिमा थोडी विशेष. 

        आपल्या सर्वांप्रमाणेच मी सुद्धा अनुभवतीय ही पोर्णिमा पण , मन स्थिर नाही अस्वस्थ आहे ,  खूप सारे प्रश्न पडलेत.  कदाचित आपण एकट्यानेच विचार करून ,  या प्रश्नांची उत्तर मिळतील असे वाटत नाही , कदाचित एखादा वाचक सुद्धा सहजच उत्तर देऊन जाईल मला पडलेल्या प्रश्नांच !                 या अपेक्षेत !

      आज चंद्राला पूर्णत्व येणार आहे ,  जे मुठभर सुद्धा माणसांना नसते या पृथ्वीतलावर . आपण पूर्ण नाही आहोत ही गोष्ट मान्य न करणारी माणसे  ,  आपल्यात असलेली अपूर्णता कशी चुकीची आहे हे पटवून देण्याचा वायफळ प्रयत्न करणारी नाती ,  त्यांना आज या पौर्णिमेच्या निमित्ताने का होईना भानं होईल पूर्णत्व काय असतं  त्याचं आणि ते पूर्णत्व प्राप्त करण्यासाठी स्वतःच अस्तित्व पणाला लावावं लागतं  याचही....  आणि तेव्हा कुठे अंधारावर विजय मिळवून पूर्णत्व प्राप्त केलेल्या चंद्राला वर्षातून एकदा उत्सवानिमित्त पाहतो आपण  . तसा तर तो दरच पौर्णिमेला आलेला असतो पण कोणाला त्याचं काही नसतं.  केवळ वार ,  तारीख,  दिवस,  महिने बदलणाऱ्याच या घटना ठरतात . 

            माणुस अपेक्षेने ग्रासला आहे ,  ठरवून टाकतो किंबहुना शिक्कामोर्तब करतो समोरचा कसा चुकतोय,  कसा वाईट आहे. नात्यांना स्वतःच गृहीत धरतो , त्याला नाती म्हणून फक्त आईवडील आणि त्यांच्याकडूनच विनामूल्य मिळालेले भाऊबहीणीचे नाते हीच माहीत असतात , पण काहीजण तर त्याही नात्यात अंतर निर्माण करतात.  इथे कोणतीच गोष्ट फुकट मिळत नाही हे वाक्य  ज्याने जगप्रसिद्ध केलं त्याला सलाम !   पण एक गोष्ट तो  सांगायला विसरला की ,  इथे नाती सुद्धा फुकट मिळत नाहीत . माया खर्च करावी लागते त्यासाठी ,  जीव गुंतवावा लागतो,  मोबदल्यात काय मिळणार याचा विचार न करता,  प्रसंगी आयुष्य पणाला लावावे लागते.  

      मनुष्य  कधी स्वतःहून पूर्णत्वाकडे जाण्याचा प्रयत्नच करीत नाही  आणि मग सुंदर आयुष्य  , चंद्रासारखं तेजस्वी तारुण्य स्वतःच निर्माण केलेला गुंता सोडवण्यात व्यर्थ करतो.  आयुष्यात प्रत्येकालाच कधी ना कधी नवीन नाती जोडायचीच असतात , पण म्हणून आपली जन्मजात नाती विसरून कसं चालेल ?  उलट जो नव्या नात्याबरोबर आपली असलेली  नाती विलक्षण कौशल्याने हाताळतो ,  नात्याच्या सोबत चालतो , परकेपणाचा अंशही जाणवू देत नाही त्याच्या  आयुष्यात रोजच पोर्णिमेचा चंद्र उगवतो आणि नात्यातलं प्रेम खरोखर चंद्राच्या चांदण्याप्रमाणे शीतल वाटू लागते.  

       पौर्णिमेचा चंद्र हे  तर सांगत नाहीये  ना ,  पूर्णत्वाचा गर्व करणाऱ्या माणसास  , नको समजू स्वतःलाच  पूर्ण,   पूर्णत्वासाठी तु झटत राहा कारण पौर्णिमेला जो चंद्र अंधारावर मात करून चमकतो त्याला एक दिवसापुरते का असेना अमावस्येचा काळोख गिळून टाकतो ....  

  तु  तर साधारण मनुष्य आहेस...

                        तु  तर साधारण मनुष्य आहेस.... ⚫⚫⚫

आरती संजय गवळी 




Thursday, October 29, 2020

जन्मभूमि

       अनु..... ऐ .... अनु..... आई बोलावते ग तुला ! असे सांगून रमेश , अनुचा भाऊ झोपायला गच्चीवर गेला.  अनुचे बाबा   नोकरीनिमित्त बाहेरगावी असतात . आईचं यावेळी काय काम  आहे हे पाहण्यासाठी अनु  गेली , तर आई अंगणात बसली  होती. 

अनु ,  "आई..." का बोलावलस मला ? काही काम होत का ग ?   आई , " नाही ग बाळा ! "  काही काम नाही,  सहज बोलावलं . म्हंटल आता अनु सासरी जाणार , असा निवांतपणा एकदा का लग्नाची तयारी सुरू झाली की नाही मिळायचा म्हणून मुद्दाम बोलावल.   (अनु एक स्वतंत्र विचारांची,  सुशिक्षित मुलगी आहे..) 

         आई ! मी काय थोडीच कायमची जाणार आहे ?  येईन मी हवं तेव्हा ..... तु उगाच काळजी करतेस बघ. हे बघ तु मला  गप्पा मारायला बोलावलंय ना ?  तर मग चल आपण बोलू . असं म्हणून अनुने आईला मिठी मारली आणि सुरू झाल्या गप्पागोष्टी सर्वात प्रेमळ,  अवर्णनीय अशा मायेच्या.  

      आई अनुला सांगू लागली , तिच्या लग्नानंतर माहेरच्या गोड आठवणी . प्रत्येक भेटीला माहेर नवं भासतं ग अनु !  एकदम बदललेली वस्तुंची जागा ,  सहजपणे एखादी वस्तु सापडतच नाही , अनोळखी  कोपरे, भिंती सगळ नवीन वाटत.   हे मन मानायला तयारच होत  नाही की हे बदल होत असतात आणि हे माझ्या एकटीपुरते नाहीत सगळ्यांच्याच आयुष्यात होतात.  

        पण का माहीत नाही अनोळखी वाटत राहत आपलच घर आपल्यालाच.   ते घर जिथे शाळा सुटल्यावर कोण आधी घरी पोहोचेल याची शर्यत असायची , ते  घर जिथे रविवारी अंगणात भावंडासोबत पंगत बसायची ,  रोज एका मैत्रिणीच्या अंगणातील पळापळी चा खेळ . किती साऱ्या गोष्टी मागे पडून जातात.  

पण खरं सांगू अनु , हे नवीन  भासणार माहेर ,  खूप ओढ लावतं मनाला,  प्रत्येक वेळेस तेवढ्याच नवेपणाण भेटते मी त्याला  आणि मग जरी आज खूप अवकाशाने,  नव्या नजरेने नुसतेच अंगण  न्याहाळून पाहिले तरी बोलत राहते एकएक आठवण मीच माझ्याशी आणि आकाशाकडे बघून एकदा डोळ्यात भरते साऱ्या आठवणी आणि घेते एक गिरकी स्वच्छंदपणे.  

      आई माहेरच्या आठवणीत रमलेली असतानाच अनु विचारते ,  आई... मग जेव्हा तुला माहेरची आठवण होत असे तेव्हा तु का नाही जायची ? अनु ,  काय आहे ना बाळा माहेरी असं मन होईल तेव्हा नाही जाता येत त्या साठी काही कार्य,  निमित्त,  सणवार,  दुखणीखुपणी,  बाळंतपण अशी काही कामं असतील तर जाणं होत.  

अनुने आईकडे आश्चर्यचकित होऊन पाहील,  म्हणजेच माहेर हे स्त्री साठी निमित्तमात्र होऊन जात का गं आई ?  अस कस असु शकत आई ? माझं  घर , जिथे आयुष्यातील 25 वर्ष घालवली , त्या माझ्या जन्मभूमिला  मी निमित्त काढून भेटायला यायचं ? 

      कस शक्य आहे हे आई ?  मला तर आता स्वातंत्र्यवीर सावरकर आठवू लागले आहेत , सातासमुद्रापार काळ्याकुट्ट अंधारातून आर्त हाक देताना तयाच्या  मातृभूमि ला....

ने मजसी  परत मातृभूमि ला ,  सागरा प्राण तळमळला....

 तेव्हा  त्यांचंही ह्रदय माहेराची ओढ मनात दाटून ठेवणााऱ्या स्त्री सारखेेेच  भासू लाागले आहे मला.  कशासाठी हवे  मला निमित्त माझ्या जन्मभूमि ला भेटायला ? मी का कोणाच्या बंदिवासात आहे  ? हक्क आहे मला,   जितके कष्ट तुम्ही रमेश साठी घेतलेे तितकेच माझ्यासाठी त्यामुळेच ह्या  जन्मभुुुमि वर जेवढी रमेश ची माया तेवढीच माझी सुद्धा.   एका नव्या नात्यात गुंफल्याने लगेेेच या मायेला परकी होईल काय मी ? 

बाबा, रमेश  नोकरीनिमित्त बाहेर राहतात त्यांचे पाय आपोआप वळतात घराकडे जेव्हा आठवण होईल तेव्हा ,  ते काय कोणाची परवानगी घेतात घराच्या ओढीनं येतात ना मग मी का नाही ?  

असं म्हणून अनुने अंगणातील माती हातावर घेतली आणि चांदणं भरलेल्या आभाळाकडे बघून सांगितल,  मी येईन मला हवं तेव्हा   आणि रुजेल ही पण प्रथा जेव्हा मी आवाज उठवेल.  

😊😊😊😊

आरती .... (भारत कन्या )   


Tuesday, October 27, 2020

बहु जलाओगे, तो बेटी कहा से लाओगे।

           रविवार चा दिवस होता ,  ऑफिस ला सुट्टी असल्याने दिव्या ने घर आवरायच ठरवले.  समीर  , दिव्याचा पती कामानिमित्त बाहेरगावी गेल्याने स्वयंपाक न  करताच ती कामाला लागली . अचानक घर आवरताना तिला आठवलं मागच्या वेळेस जेंव्हा घर आवरले तेव्हा मई (दिव्या  ची नणंद ) होत्या मदतीला.मनातच स्मित हास्य करून   तिने काम आवरून मई ला फोन करू असे ठरवले आणि आवरणयात मग्न झाली.  

          कोणती वाईट इच्छा घेऊन ऊगवला होता तो दिवस कोण जाणे की दिव्याला त्या दिवशी मई ची सतत आठवण होऊन सुद्धा ती कामात व्यस्त राहिल्याने फोन लावू शकली  नाही . आणि त्या वाईट दिवसातील अत्यंत वाईट बातमी मिळाली.  

               मई ला तिच्या सासरच्या माणसांनी  हुंडया साठी जाळून मारले.  दिव्या चे हात पाय सुन्न , विश्वास बसेना , काय करावे सुचेना , समीर नव्हता आणि त्याचा फोनही लागेना. अस काही दिव्या पहिल्यांदाच अनुभवत होती आणि जगातील वाईट माणसे कोणत्या थराला जाऊ शकतात याचा विचार ती करत होती.  दिव्या च्या लग्नानंतर ती मई सोबत 6 महिने राहिली होती.  त्यामुळे दोघीमधील विषेश जिव्हाळ्याचे नाते तयार झाले होते. अंतिम संस्काराला समीर वेळेत पोहचू शकला नाही. भाऊ-बहीणीच नातं फार प्रेमाच होतं.

     इतकी गुणी , मुलगी,  देखणी , अत्यंत चुणचुणीत  मई फक्त एका चुकीने गेली ती म्हणजे  आईवडिलांनी  सहन करायचच शिकवले , कारण  तु मुलगी आहेस , सोशीक बन तर आयुष्य आहे .सासरच्यांनी कितीही त्रास दिला तरी तसच सहन करायचे इथेच  चुकतो आपण , मुलगी म्हणून तिने कायकाय करावे आणि काय करू नये याचा पाढाच तयार करतो.   

     मई तर  गेली , आईवडील भाऊ - बहीण सावरले असतील यातुन पण आजही मईचा मारेकरी मोकाट फिरतोय .अजुन कोर्टात केस चालूच आहे.  तपासानंतर त्याचे पहिल्यांदाच एक लग्न झाल्याचे उघड झाले.  म्हणजे ही माणसे माणसे नाहीत . त्यांना लग्न म्हणजेही पैसे कमावण्याचे साधन वाटते . आता त्याच पहिल्या पत्नी बरोबर संसार थाटून दोन  मुलांना जन्म दिला. पण एक निष्पाप बळी गेला आहे.  आणि असे रोज किती जातात?  

बेटी बचाओ, बेटी पढाओ हे फार चांगल समजल आहे लोकांना  खुप छान योजना आहे ही सरकार ची  पण त्या लाडली ची मई होऊ  नये .  महिला आज अंतराळात पोहचली पण ही संख्या सर्वच क्षेत्रात मुठभर आहे . जोपर्यंत सर्वात शेवटची स्त्री  सुरक्षित,  सुशिक्षित,  आणि स्वावलंबी,  होत नाही तोपर्यंत रोज एक मई तयार होईल . हळदी कुंकवाचे कार्यक्रम बास झाले आता.  पहिल्यांदा हातात  धरलेली लेखणी जोपर्यंत  वेळ प्रसंगी एकटे राहण्याचे,  लढण्याचे बळ देत नाही तोपर्यंत थांबू  नका.  

 2012 वर्ष चालू होत ही घटना घडली तेव्हा  डाॅ.  ए.  पी. जे.  अब्दुल कलाम  यांनी 2020 भारत महासत्ता होणार असा  दृष्टीकोन लोकांसमोर मांडला होता  . आज हा ब्लॉग वाचल्यानंतर सुशिक्षित म्हणवून घेणाऱ्या जनतेने एक गोष्ट नक्की करावी मी  हुंडा घेणार नाही व त्या द्वारे समाजात सकारात्मक संदेश देण्यास सुरुवात करेन  . उशिरा का होईना आपला देश महासत्ता होईल.  

Join my telegram channel  👇👇👇👇                  @kaviaratisanjay

               

  




पुर्ण अपुर्ण

 थकले आहे मी महिला दिवस साजरे करून .   महिला दिन नुसतेच नकोत  शुभेच्छा देण्यापुरते ,   कपडे आणि वस्तूंवर सुट देण्यापूरते ,  सेल्फी काढून फ...