Friday, October 30, 2020

पूर्ण अपुर्ण ...⚪⚫⚪⚫

      चला.... चला.... चंद्रदर्शना ची वेळ झाली ,  दुध घेतल का ? मी आलेच , तुम्ही व्हा पुढे अशी काहीशी एकसारखीच लगबग आज सर्वत्र सुरू असेल... त्यात आज अजून एक पर्वणी म्हणजे "ब्लू मून " .... त्यामुळे यावेळची कोजागिरी पोर्णिमा थोडी विशेष. 

        आपल्या सर्वांप्रमाणेच मी सुद्धा अनुभवतीय ही पोर्णिमा पण , मन स्थिर नाही अस्वस्थ आहे ,  खूप सारे प्रश्न पडलेत.  कदाचित आपण एकट्यानेच विचार करून ,  या प्रश्नांची उत्तर मिळतील असे वाटत नाही , कदाचित एखादा वाचक सुद्धा सहजच उत्तर देऊन जाईल मला पडलेल्या प्रश्नांच !                 या अपेक्षेत !

      आज चंद्राला पूर्णत्व येणार आहे ,  जे मुठभर सुद्धा माणसांना नसते या पृथ्वीतलावर . आपण पूर्ण नाही आहोत ही गोष्ट मान्य न करणारी माणसे  ,  आपल्यात असलेली अपूर्णता कशी चुकीची आहे हे पटवून देण्याचा वायफळ प्रयत्न करणारी नाती ,  त्यांना आज या पौर्णिमेच्या निमित्ताने का होईना भानं होईल पूर्णत्व काय असतं  त्याचं आणि ते पूर्णत्व प्राप्त करण्यासाठी स्वतःच अस्तित्व पणाला लावावं लागतं  याचही....  आणि तेव्हा कुठे अंधारावर विजय मिळवून पूर्णत्व प्राप्त केलेल्या चंद्राला वर्षातून एकदा उत्सवानिमित्त पाहतो आपण  . तसा तर तो दरच पौर्णिमेला आलेला असतो पण कोणाला त्याचं काही नसतं.  केवळ वार ,  तारीख,  दिवस,  महिने बदलणाऱ्याच या घटना ठरतात . 

            माणुस अपेक्षेने ग्रासला आहे ,  ठरवून टाकतो किंबहुना शिक्कामोर्तब करतो समोरचा कसा चुकतोय,  कसा वाईट आहे. नात्यांना स्वतःच गृहीत धरतो , त्याला नाती म्हणून फक्त आईवडील आणि त्यांच्याकडूनच विनामूल्य मिळालेले भाऊबहीणीचे नाते हीच माहीत असतात , पण काहीजण तर त्याही नात्यात अंतर निर्माण करतात.  इथे कोणतीच गोष्ट फुकट मिळत नाही हे वाक्य  ज्याने जगप्रसिद्ध केलं त्याला सलाम !   पण एक गोष्ट तो  सांगायला विसरला की ,  इथे नाती सुद्धा फुकट मिळत नाहीत . माया खर्च करावी लागते त्यासाठी ,  जीव गुंतवावा लागतो,  मोबदल्यात काय मिळणार याचा विचार न करता,  प्रसंगी आयुष्य पणाला लावावे लागते.  

      मनुष्य  कधी स्वतःहून पूर्णत्वाकडे जाण्याचा प्रयत्नच करीत नाही  आणि मग सुंदर आयुष्य  , चंद्रासारखं तेजस्वी तारुण्य स्वतःच निर्माण केलेला गुंता सोडवण्यात व्यर्थ करतो.  आयुष्यात प्रत्येकालाच कधी ना कधी नवीन नाती जोडायचीच असतात , पण म्हणून आपली जन्मजात नाती विसरून कसं चालेल ?  उलट जो नव्या नात्याबरोबर आपली असलेली  नाती विलक्षण कौशल्याने हाताळतो ,  नात्याच्या सोबत चालतो , परकेपणाचा अंशही जाणवू देत नाही त्याच्या  आयुष्यात रोजच पोर्णिमेचा चंद्र उगवतो आणि नात्यातलं प्रेम खरोखर चंद्राच्या चांदण्याप्रमाणे शीतल वाटू लागते.  

       पौर्णिमेचा चंद्र हे  तर सांगत नाहीये  ना ,  पूर्णत्वाचा गर्व करणाऱ्या माणसास  , नको समजू स्वतःलाच  पूर्ण,   पूर्णत्वासाठी तु झटत राहा कारण पौर्णिमेला जो चंद्र अंधारावर मात करून चमकतो त्याला एक दिवसापुरते का असेना अमावस्येचा काळोख गिळून टाकतो ....  

  तु  तर साधारण मनुष्य आहेस...

                        तु  तर साधारण मनुष्य आहेस.... ⚫⚫⚫

आरती संजय गवळी 




2 comments:

पुर्ण अपुर्ण

 थकले आहे मी महिला दिवस साजरे करून .   महिला दिन नुसतेच नकोत  शुभेच्छा देण्यापुरते ,   कपडे आणि वस्तूंवर सुट देण्यापूरते ,  सेल्फी काढून फ...