Tuesday, March 14, 2023

आजोबा .....आप्पा


                आप्पा....... २० फेब्रुवारी २०२३  रोजी आमच्यातून गेले . ते गेले खरे पण आठवणी अजून ओसरल्या नाहीत . २ मुले , पत्नी , ६ मुली आणि अर्थातच या सगळ्यातून तयार झालेली नात्यांची समृद्धता सर्व सोडून गेले . वयाच्या ३३ व्या वर्षापर्यंत मी स्वतःला फार समृद्ध मानत आले कारण मला आई आणि वडील या दोन्हीकडील आजी आणि आजोबा ह्या नात्यांचे प्रेम प्राप्त झाले . पण आज या नात्यातला एक मोती निसटला आणि माझी समृद्धी कमी झाली . माणूस कधीतरी जाणारच की !    पण स्वीकारायला वेळ  लागतो . आम्ही सगळे सावरलो आता आपापल्या संसारात  , मुला बाळात मग्न झालो . पण आजी आतून तुटली .  ७० वर्षे आपण ज्यांच्याबरोबर आयुष्य  घालवलं ती सोबत आता होणे नाही , हे तिला स्वीकारायला वेळ लागेल . वेळ सर्वच दुखांवर च औषध पण त्यासाठी संयम हवा . या वयात ती इतका संयम कुठून आणणार ? त्यांची २ मुले , ६ मुली , सूना ,२९ नातवंडे ५० ते ५५ पत्वांडे तिला यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करू. 

                 पंचक्रोशीत मोठ नाव असल्याने १० दिवस सतत कोण ना कोण भेट घेण्यास येत होते .  शेजारच्या काही गावातील सरपंच , आमदार बबनदादा शिंदे यांचे चिरंजीव रंजीत दादा , पंढरपूरच्या कारखान्याचे चेअरमन आणि तेथीलच लोकप्रिय इंजिीअरिंग कॉलेज चे प्राचार्य , आणि इतर . तसेच त्यांच्या सर्व विधी ला खूप जास्त संख्येने जनसमुदाय उपस्थित होता . त्यांचा राजकीय कार्यात जास्त सहभाग होता . त्यामुळे या लोकांमध्ये त्यांच्याबद्दल वेगळा आदर होता . त्यांना डी. जी. आप्पा या लोकप्रिय नावाने ओळखत असत . 

                   मला त्यांच्यासोबत चे काही प्रसंग सांगावेसे वाटतात . आपण जेव्हा लहान असतो तेव्हा , आपल्याला वळण लागण्यासाठी आपले आई वडील मार द्यायचे त्या मारातन सुटका करतील फक्त दोनच व्यक्ती आजी किंवा आजोबा .  मला एक प्रसंग कायम लक्षात राहणारा आहे  . आणि त्या प्रसंगाची त्यांच्या मृत्युच्या आदल्या दिवशी आठवण होऊन मी तो संजय सोबत शेअर केला . तो असा.... मी ,  अमृत आणि पल्लवी ... एका उन्हाळ्याच्या सुट्टीत आप्पा आम्हाला लग्नाला घेऊन गेले . ते गाव  अतिशय आडवळनी असल्याने त्या गावाला जाण्यासाठी एकच एसटी होती . त्या एसटीची वाट पाहत त्या काळात बस स्टँड वर उभा राहणे हे एक तप च होत आमच्यासाठी . त्या बस स्टँड वर एक कंडक्टर जवळपास १ तास झाला तरी एकाच एसटी च नाव सुरात पुकारत होता वडाची वाडी - उपळाई - माढा. मग काय आमचा खेळ सुरू झाला आम्ही एका सुरात तिघांनी तोच ताल धरला आणि घरी पोहचलो तरी सुद्धा हाच खेळ सुरू . आजही या तीन गावांची नाव ऐकली की हा प्रसंग आहे असा डोळ्यासमोर उभा राहतो . मग जेव्हा बस भेटली तेव्हा आम्ही त्या लग्नाच्या गावी पोहचलो,  मग काय उतरल्यावर समजलं की आता एक भलामोठा चढ चढून आम्हाला लग्नस्थळी पोहचायचे होते . ते ही अंतर कापलं आणि पोहचलो .आजही आहे असा तो लग्न समारंभ डोळ्यासमोर आहे . आजोबांना त्यांच्या नातवंडांना  कुठे घेऊन जायचं असेल की ते कितीही त्रास सहन करायला तयार होतात. 

                      असाच एक प्रसंग अमर भैय्या (न्या. अमरजीत जाधव ) ने आमच्यासोबत शेअर केला होता . तो घरातला पहिला मुलगा त्यामुळे जास्त लाडका . गावात कोणा एकाच लग्न जमवण्यासाठी आप्पा ना बोलावणं आल . त्या काळी पायी जायचं पण तरी सुद्धा भैय्या ला घेऊन जायचं . मग त्यांनी त्यांच्यासोबत दोन माणसे घेतली , त्यांच  काम फक्त भैय्या ला खांद्यावर घेणं होत . असे आजोबा असतील तर ते कधी जावे वाटतील का ? हाच  त्यांचा नातू न्यायाधीश झाला  तेव्हा त्यांच्या हस्ते  बोलावलेल्या प्रमुख पाहुण्यांसमोर त्यांनी त्यांच्या नातवाचा सत्कार केला होता . 

                      आम्हा सर्व नातवंडांना घेऊन ६ ते ७ वर्ष पंढरपूर येथे शिक्षणासाठी आमच्यासोबत राहिले . तेव्हाचे काही प्रसंग आठवतात . एक्साम असली की मी जेव्हा त्यांना जागरण करते असं वाटायचं तेव्हा ते उठून विचारायचे ....... किती वाजले आता ? झोपाव , उद्या  करावं राहिलेलं .  मला एकदा पंढरपूर वरून कोल्हापूर ला जाणाऱ्या एसटी त एक आजोबा भेटले . असेच ते गप्पा मारत होते आणि मला म्हणाले. .... बाळ ,   तू  कोणत्या गावची  ? मी म्हणाले जळोली . मग त्यांनी  मला  नाव विचारले मी म्हणाले आरती जाधव . मग ते बोलले ज्ञाना आप्पा ला ओळखते  का ? मी म्हणाले हो मी त्यांची नात . यावरून च लक्षात येते त्यांची व्याप्ती  ह्या आणि अजून खूप साऱ्या आठवणी आहेत . छोटे छोटे प्रसंग आहेत माझ्यासोबत च शौर्य ला ही त्यांचे आशीर्वाद आणि सहवास लाभला याचे  सौख्य आहे . असे होते आमचे आजोबा स्वतः ही खूप समृद्ध् आयुष्य जगले , खूप माणसे जोडली व आमच्यासाठी ही ठेव ठेऊन गेले 😢😢

             भारतीय संस्कृतीत जोडीदार गेला की हयात स्त्रीला आपले आभूषणे घालता येत नाहीत . तिला विधवा म्हणून यातून बाजूला केले जाते.   आप्पांच्या जाण्याने हे सर्व प्रसंग फार जवळून अनुभवले आणि वाईट वाटले , असल्या संस्कृती ची चीड ही आली . आक्का चा   तो आवाज आजही कानी येतो जेव्हा तिचे जोडवे , मंगळसुत्र, बांगड्या ही सुवासिनी ची लेणी आप्पांच्या राखेत टाकायचे होते आणि काहींनी ती पुढे होऊन काढून घेतली .  आधीच जोडीदाराच्या जाण्याने खचलेली स्त्री हे सर्व  कस सहन करत असेल ? जिला जास्त आधाराची गरज असते तिला अशा पद्धतीने खचवले जाते . पण काही उपयोग नाही जिथे महात्मा फुले हरले तिथे आम्ही कोण ? आज्जीच पांढर कपाळ बघायची सवय करून घ्यायची .  


                                                   🌸🙏श्रद्धांजली🙏🌸

                                                 कै. ज्ञानोबा जिजाबा जाधव 

आप्पांची नात आरती

@Copyright claim  copy with name

mpsc.aratigawali@gmail.com

No comments:

Post a Comment

पुर्ण अपुर्ण

 थकले आहे मी महिला दिवस साजरे करून .   महिला दिन नुसतेच नकोत  शुभेच्छा देण्यापुरते ,   कपडे आणि वस्तूंवर सुट देण्यापूरते ,  सेल्फी काढून फ...