Tuesday, March 14, 2023

आजोबा .....आप्पा


                आप्पा....... २० फेब्रुवारी २०२३  रोजी आमच्यातून गेले . ते गेले खरे पण आठवणी अजून ओसरल्या नाहीत . २ मुले , पत्नी , ६ मुली आणि अर्थातच या सगळ्यातून तयार झालेली नात्यांची समृद्धता सर्व सोडून गेले . वयाच्या ३३ व्या वर्षापर्यंत मी स्वतःला फार समृद्ध मानत आले कारण मला आई आणि वडील या दोन्हीकडील आजी आणि आजोबा ह्या नात्यांचे प्रेम प्राप्त झाले . पण आज या नात्यातला एक मोती निसटला आणि माझी समृद्धी कमी झाली . माणूस कधीतरी जाणारच की !    पण स्वीकारायला वेळ  लागतो . आम्ही सगळे सावरलो आता आपापल्या संसारात  , मुला बाळात मग्न झालो . पण आजी आतून तुटली .  ७० वर्षे आपण ज्यांच्याबरोबर आयुष्य  घालवलं ती सोबत आता होणे नाही , हे तिला स्वीकारायला वेळ लागेल . वेळ सर्वच दुखांवर च औषध पण त्यासाठी संयम हवा . या वयात ती इतका संयम कुठून आणणार ? त्यांची २ मुले , ६ मुली , सूना ,२९ नातवंडे ५० ते ५५ पत्वांडे तिला यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करू. 

                 पंचक्रोशीत मोठ नाव असल्याने १० दिवस सतत कोण ना कोण भेट घेण्यास येत होते .  शेजारच्या काही गावातील सरपंच , आमदार बबनदादा शिंदे यांचे चिरंजीव रंजीत दादा , पंढरपूरच्या कारखान्याचे चेअरमन आणि तेथीलच लोकप्रिय इंजिीअरिंग कॉलेज चे प्राचार्य , आणि इतर . तसेच त्यांच्या सर्व विधी ला खूप जास्त संख्येने जनसमुदाय उपस्थित होता . त्यांचा राजकीय कार्यात जास्त सहभाग होता . त्यामुळे या लोकांमध्ये त्यांच्याबद्दल वेगळा आदर होता . त्यांना डी. जी. आप्पा या लोकप्रिय नावाने ओळखत असत . 

                   मला त्यांच्यासोबत चे काही प्रसंग सांगावेसे वाटतात . आपण जेव्हा लहान असतो तेव्हा , आपल्याला वळण लागण्यासाठी आपले आई वडील मार द्यायचे त्या मारातन सुटका करतील फक्त दोनच व्यक्ती आजी किंवा आजोबा .  मला एक प्रसंग कायम लक्षात राहणारा आहे  . आणि त्या प्रसंगाची त्यांच्या मृत्युच्या आदल्या दिवशी आठवण होऊन मी तो संजय सोबत शेअर केला . तो असा.... मी ,  अमृत आणि पल्लवी ... एका उन्हाळ्याच्या सुट्टीत आप्पा आम्हाला लग्नाला घेऊन गेले . ते गाव  अतिशय आडवळनी असल्याने त्या गावाला जाण्यासाठी एकच एसटी होती . त्या एसटीची वाट पाहत त्या काळात बस स्टँड वर उभा राहणे हे एक तप च होत आमच्यासाठी . त्या बस स्टँड वर एक कंडक्टर जवळपास १ तास झाला तरी एकाच एसटी च नाव सुरात पुकारत होता वडाची वाडी - उपळाई - माढा. मग काय आमचा खेळ सुरू झाला आम्ही एका सुरात तिघांनी तोच ताल धरला आणि घरी पोहचलो तरी सुद्धा हाच खेळ सुरू . आजही या तीन गावांची नाव ऐकली की हा प्रसंग आहे असा डोळ्यासमोर उभा राहतो . मग जेव्हा बस भेटली तेव्हा आम्ही त्या लग्नाच्या गावी पोहचलो,  मग काय उतरल्यावर समजलं की आता एक भलामोठा चढ चढून आम्हाला लग्नस्थळी पोहचायचे होते . ते ही अंतर कापलं आणि पोहचलो .आजही आहे असा तो लग्न समारंभ डोळ्यासमोर आहे . आजोबांना त्यांच्या नातवंडांना  कुठे घेऊन जायचं असेल की ते कितीही त्रास सहन करायला तयार होतात. 

                      असाच एक प्रसंग अमर भैय्या (न्या. अमरजीत जाधव ) ने आमच्यासोबत शेअर केला होता . तो घरातला पहिला मुलगा त्यामुळे जास्त लाडका . गावात कोणा एकाच लग्न जमवण्यासाठी आप्पा ना बोलावणं आल . त्या काळी पायी जायचं पण तरी सुद्धा भैय्या ला घेऊन जायचं . मग त्यांनी त्यांच्यासोबत दोन माणसे घेतली , त्यांच  काम फक्त भैय्या ला खांद्यावर घेणं होत . असे आजोबा असतील तर ते कधी जावे वाटतील का ? हाच  त्यांचा नातू न्यायाधीश झाला  तेव्हा त्यांच्या हस्ते  बोलावलेल्या प्रमुख पाहुण्यांसमोर त्यांनी त्यांच्या नातवाचा सत्कार केला होता . 

                      आम्हा सर्व नातवंडांना घेऊन ६ ते ७ वर्ष पंढरपूर येथे शिक्षणासाठी आमच्यासोबत राहिले . तेव्हाचे काही प्रसंग आठवतात . एक्साम असली की मी जेव्हा त्यांना जागरण करते असं वाटायचं तेव्हा ते उठून विचारायचे ....... किती वाजले आता ? झोपाव , उद्या  करावं राहिलेलं .  मला एकदा पंढरपूर वरून कोल्हापूर ला जाणाऱ्या एसटी त एक आजोबा भेटले . असेच ते गप्पा मारत होते आणि मला म्हणाले. .... बाळ ,   तू  कोणत्या गावची  ? मी म्हणाले जळोली . मग त्यांनी  मला  नाव विचारले मी म्हणाले आरती जाधव . मग ते बोलले ज्ञाना आप्पा ला ओळखते  का ? मी म्हणाले हो मी त्यांची नात . यावरून च लक्षात येते त्यांची व्याप्ती  ह्या आणि अजून खूप साऱ्या आठवणी आहेत . छोटे छोटे प्रसंग आहेत माझ्यासोबत च शौर्य ला ही त्यांचे आशीर्वाद आणि सहवास लाभला याचे  सौख्य आहे . असे होते आमचे आजोबा स्वतः ही खूप समृद्ध् आयुष्य जगले , खूप माणसे जोडली व आमच्यासाठी ही ठेव ठेऊन गेले 😢😢

             भारतीय संस्कृतीत जोडीदार गेला की हयात स्त्रीला आपले आभूषणे घालता येत नाहीत . तिला विधवा म्हणून यातून बाजूला केले जाते.   आप्पांच्या जाण्याने हे सर्व प्रसंग फार जवळून अनुभवले आणि वाईट वाटले , असल्या संस्कृती ची चीड ही आली . आक्का चा   तो आवाज आजही कानी येतो जेव्हा तिचे जोडवे , मंगळसुत्र, बांगड्या ही सुवासिनी ची लेणी आप्पांच्या राखेत टाकायचे होते आणि काहींनी ती पुढे होऊन काढून घेतली .  आधीच जोडीदाराच्या जाण्याने खचलेली स्त्री हे सर्व  कस सहन करत असेल ? जिला जास्त आधाराची गरज असते तिला अशा पद्धतीने खचवले जाते . पण काही उपयोग नाही जिथे महात्मा फुले हरले तिथे आम्ही कोण ? आज्जीच पांढर कपाळ बघायची सवय करून घ्यायची .  


                                                   🌸🙏श्रद्धांजली🙏🌸

                                                 कै. ज्ञानोबा जिजाबा जाधव 

आप्पांची नात आरती

@Copyright claim  copy with name

mpsc.aratigawali@gmail.com

Thursday, March 9, 2023

जागृती काळाची गरज महिला दिन विशेष

                  महिला दिनाला एक शतका पेक्षा जास्त इतिहास आहे. १९०८ साली दक्षिण अमेरिकेतील काही महिलांनी मतदानाचा हक्क , कामाचे तास , वेतन या साठी  एकत्र येऊन निदर्शने केली होती . यानंतर अमेरिकेतील राजकीय पक्षांनी २८  फेब्रुवारी महिला दिन म्हणून साजरा केला . पहिल्या महायुद्धा दरम्यान  रशियन महिलांनी  8 मार्च हा महिला दिन म्हणून साजरा केला तेव्हा पासून ८ मार्च  हा महिला दिन म्हणून साजरा केला जातो . संयुक्त राष्ट्रसंघाने १९७५ पासून महिला दिन साजरा करण्यास सुरुवात केली . १९९२ पासून UN  ने महिला दिन हा थीम आधारित साजरा करण्यास सुरुवात केली. हा झाला महिला दिनाचा राजकीय इतिहास. 

                    महिला दिनाचा सामाजिक इतिहास वेगळा आहे , कारण राजकीय दृष्टया समाजाला दिलेली कोणतीच देणगी जशीच्या तशी समाजात रुजत नाही  .ज्या अमेरिकन महिलांच्या पुढाकाराने महिला दिन सुरू झाला त्याच अमेरिकेत आजही  महिला आणि पुरुषांना समान वेतन नाही , तिथे इतर देशांची काय कथा . समाज स्त्री कडे दुय्यम म्हणून पाहत आला आणि आजही तो तसाच पाहतो. आता तुम्ही म्हणाल असं कसं म्हणून चालेल ?  आपण केवढे बदल आत्मसात करून घेतलेत. स्त्री दिवसेंदिवस प्रगती करत आहे . पण ती एका चौकटीत आहे मैत्रिणींनो. कसे ते तुम्हीच पाहा. काही दिवसांपूर्वीचे उदाहरण घेऊ.  माननीय द्रौपदी मुर्मु देशाच्या सर्वोच्च पदावर विराजमान झाल्या, म्हणून तुम्ही असे म्हणाल का  की आता आदिवासी महिला पुढील काळात समस्यामुक्त होऊन जगेल .याचाच अर्थ भारतात शेवटच्या घटकापर्यंत विकास साधलेला नाही .  WEF (world economic forum) च्या एका ताज्या अहवालनुसार भारतात स्त्री -पुरुष समानता येण्यासाठी १३२ वर्ष लागतील .मग १३२ वर्ष नुसते स्टेटस ठेऊन महिला दीन साजरे करत बसायचे का ? या प्रश्नांना उत्तरे आहेत आणि ती आपल्याच हातात आहेत की हे १३२ वर्ष कमी कसे होतील . 

                      आज स्कॅनडेनेवियन (५ देशांचा समूह) देशात आणि अनेक पुढारलेल्या पश्चिमेकडील देशात महिलांना मासिक पाळीत ४ दिवसांची पगारी रजा मंजूर आहे. २०२३ मध्ये आपल्या सुप्रीम कोर्टाने अशीच एक  PIL फेटाळली,  सुप्रीम कोर्टा च्या मते अशा प्रकारे रजा मंजूर केल्यास महिलांना नोकरीवर ठेवताना त्यांना ठेवायचे की नाही यावरून भेदभाव होईल जे आपल्या घटनेला अपेक्षित नाही. तसेच २०२२ च्याच एका केस मध्ये सुप्रीम कोर्टाने काही निकाल दिले त्यामध्ये वडिलांच्या संपत्तीत मुलींना समान हक्क , अविवाहीत मुलींना विशिष्ट कालावधी उलटून गेल्यावर अबॉर्शन करण्याचा हक्क , २०१९ साली ट्रीपल तलाक. हे सर्व निर्णय स्वागतार्ह आहेत पण ते वेळीच होऊ शकले नाहीत  याची खंत आहे  . 

                       महिलांचा मंदिर प्रवेश हा मुद्दा आजही गाजतो आहे . केरळ मधील शबरिमाला मंदिर प्रवेशा संदर्भात धार्मिक हस्तक्षेपामुळे सुप्रीम कोर्टाकडून स्थागिती देण्यात आली. यासारख्या अनेक धार्मिक बाबीत महिलांना प्रवेश नाकारला जातो. महिलांना स्वातंत्र्य द्या ही गोष्ट मागावी का लागत आहे, याचा आम्हाला विसर पडला आहे . १०डिसेंबर  १९४८ हा तो दिवस आहे ज्या दिवशी संयुक्त राष्ट्रांनी मानवी हक्कांचा जाहीरनामा स्वीकारला. ज्याच्या कलम २ नुसार प्रत्येक व्यक्ती जन्मतः स्वतंत्र आहे आणि कलम १२ नुसार त्या व्यक्तीला स्वतःचं जीवन स्वतःच्या पद्धतीने जगण्याचा हक्क आहे .मग आम्हाला ७५ वर्ष होऊनही प्रत्येक गोष्ट विचारावी का लागते ?  मंदिरात प्रवेश करण्यासाठी कोणत्याही साधू , महंतला का विचारायचे आहे ? तुम्ही सर्व गोष्टी आहे अशा स्वीकारता म्हणून समाज जास्त बळकट होऊन तुमच्यावर अन्याय करत राहतो . कारण ना तुम्हाला मानवी हक्कांचा जाहीरनामा माहीत आहे ना तुम्हाला घटनेने दिलेले मूलभूत हक्क माहित आहेत ! एखाद्या सणाप्रमाने महिला  दिन साजरा करायचा ,छान  स्टेटस ठेवायचे. पुन्हा आहे तशी जिंदगी सुरु. मग नेक्स्ट महिला दिन अशी १०० वर्षे लोटली सख्यानो . 

                      काही महिलांना  मी चुकीच बोलत आहे असंही वाटू शकतं , कारण त्यांनी स्त्री स्वातंत्र्याचा चुकीचा अर्थबोध घेतलेला असतो. काही प्रमाणात तो असा असतो की त्यांना स्वतःला त्या ज्या घरात राहिल्या वाढल्या आणि ज्या घरात नांदत आहेत तिथे त्यांना काही प्रमाणात सुट मिळते जसे की हवी ती कपडे घाला,  शॉपिंग, फिरणे आणि बऱ्याच गोष्टी . तर मैत्रिणींनो थोड थांबा , पहिली गोष्ट म्हणजे महिला दिन हा जागतिक पातळीवर चा आहे आपल्या घरापुरता मर्यादित नाही , दूसरी गोष्ट म्हणजे जेंडर गॅप कमी करणे हे दुसरं उद्दिष्ट आहे जे अजून साध्य होण्यास १३२ वर्ष लागणार आहेत , आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे वुमन एम्पॉवरमेंट म्हणजे पाहिजे ते कपडे घालणं वगैरे नसून ते स्त्रियांचा रोजच्या इकॉनॉमिक हालचालींमध्ये असलेला सहभाग आहे . आर्थिक घडामोडींमध्ये स्त्रियांचा सहभाग हा मानव विकास अहवालातील एक आयाम असून त्यामध्ये आपण खूप मागे आहोत असे संयुक राष्ट्राचे मत आहे तसेच शाश्वत विकास या संयुक्त राष्ट्राच्या २०१२ मधील १७ उद्दिष्टांपैकी १ उद्दिष्टं लैंगिक समानता हे आहे , जी आपणास २०३० पर्यंत साध्य करणे आहे.   

                      जेंडरगॅप चा विचार केल्यास भारतामध्ये  १००० मुलांमागे ९२९ मुली आहेत . महाराष्ट्रात २०११ च्या  जनगणनेनुसार बाल लिंग गुणोत्तराचा विचार केल्यास १००० बालकांमागे ८६१ बालिका आहेत . ही तफावत फार मोठी आहे . आताच आपण सोलापूर जिल्ह्यात नवरदेवाचा जो मोर्चा पहिला तो या आधी निर्माण झालेल्या लिंग गुणोत्तराच्याच फरकाचा परिणाम होता. २००८ पासून संसदेत महिलांना राजकीय आरक्षण ५०% असावे हे विधेयक प्रलंबीत आहे . स्थानिक स्वराज्य संस्थेत 50%आरक्षण मंजूर केले पण बायको निवडून येते आणि नवरा कारभार पाहतो अशी त्या आरक्षणची गत आहे . 

                      हे झाले सर्व स्त्री वर अन्याय होतो वगैरे . नाण्याच्या २ बाजू नेहमी तपासाव्या म्हणतात तस ,  पुरुषांवर स्त्री कडून अन्याय होण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे असे वर्तमापत्राद्वारे वाचनात आले होते .पण हे सहजासहजी पटत नाही , एक बातमी अशी देखील वाचनात आली की बिहार राज्यात पत्नी आणि आई च्या भांडणाला कंटाळून एका जिल्हाधिकाऱ्यांनी आत्महत्या  केली . IPC कलम ४९७ हा व्याभिचाराचा गुन्हा सिद्ध झाल्यास फक्त पुरुषाला सजा होत असे आणि  याचा फायदा घेत कित्येक स्त्रियांनी सुद्धा ४९७ चा गैरवापर केला आहे . त्याप्रमाणेच कलम ४९८अ ज्यानुसार महिलेचा मानसिक व शारीरिक छळ करण्यात आल्यास सासरच्या मंडळींना अटक करण्यात येत असे या कलमाचा सुद्धा सुप्रीम कोर्टाच्या इतिहासात खुप गैरवापर केला गेला. अगदी ताजी बातमी २०२२ ची आहे . अशावेळी तुम्ही काय म्हणाल 

                          मी माझ्या जवळच्या पुरूष नातेवाईकांना जेव्हा विचारते की स्त्री स्वातंत्र्य ,  स्त्री - पुरूष समानता यावर त्यांची काय मत आहेत ?  तर बऱ्याचदा त्यांची ही उत्तर आहेत की स्त्री स्वाभाविक रित्या भावनिक असल्याने बऱ्याचदा अमिषाला बळी पडणे , फसवले जाणे , सायबर क्राईम, या गोष्टी ओळखू शकतं नाही . काही वेळा  ओळखून सुद्धा वाहवत जाते , ठामपणाचा अभाव , शिक्षणाचा अभाव , नात्यांमध्ये सूडबुद्धी ने वागणे या गोष्टींमुळे स्वतःची प्रगती स्वतःचं खुंटवण्यास कारणीभूत ठरते.  इथेच मेख आहे १३२ वर्ष कमी करण्याची पुरूष मंडळी नी महिलांबाबत बनवून ठेवलेली मत खोडून काढता आली पाहिजेत त्यासाठी एकमेकींचा आदर करायला शिका . सासु नणंद ही नाती मैत्रीच्या दर्जावर आणण्याचा प्रयत्न करा . ठाम बना पटकन विश्वास ठेवणे बंद करा. स्वतःमध्ये बदल घडवण्याची धडपड चालू ठेवा 

                         शेवटी स्त्री एक शक्ति आहे तिने त्या शक्ति चा चांगला वापर केला तर वामनराव पै म्हणतात तसे घराचा स्वर्ग बनवते आणि सूडबुद्धीने वागली तर  त्याचं घराची राखरांगोळी करते . संपूर्ण पुरूषी पद्धतिने वागणे म्हणजे स्त्री स्वांतत्र्य नाही तर व. पू काळे म्हणतात तसे निसर्गाने स्त्री आणि पुरुष हे दोन वेगळे घटक निर्माण केले आहेत . त्यांच्याकडून निसर्गाला जस अपेक्षित आहे तस त्यांनी वर्तन करावे . स्त्री आणि पुरुषाला त्यांची त्यांची शक्ति निसर्गाने प्रदान केेली आहे त्याचा प्रत्येकाने योग्य वापर करावा. 

शेवटी Nothing is perfect in life but atleast try to go near about perfect

            mpsc.aratigawali@gmail.com

आरती गवळी

Copy with name  @copyright claim 

                      

                     

                   

पुर्ण अपुर्ण

 थकले आहे मी महिला दिवस साजरे करून .   महिला दिन नुसतेच नकोत  शुभेच्छा देण्यापुरते ,   कपडे आणि वस्तूंवर सुट देण्यापूरते ,  सेल्फी काढून फ...