महिला दिनाला एक शतका पेक्षा जास्त इतिहास आहे. १९०८ साली दक्षिण अमेरिकेतील काही महिलांनी मतदानाचा हक्क , कामाचे तास , वेतन या साठी एकत्र येऊन निदर्शने केली होती . यानंतर अमेरिकेतील राजकीय पक्षांनी २८ फेब्रुवारी महिला दिन म्हणून साजरा केला . पहिल्या महायुद्धा दरम्यान रशियन महिलांनी 8 मार्च हा महिला दिन म्हणून साजरा केला तेव्हा पासून ८ मार्च हा महिला दिन म्हणून साजरा केला जातो . संयुक्त राष्ट्रसंघाने १९७५ पासून महिला दिन साजरा करण्यास सुरुवात केली . १९९२ पासून UN ने महिला दिन हा थीम आधारित साजरा करण्यास सुरुवात केली. हा झाला महिला दिनाचा राजकीय इतिहास.
महिला दिनाचा सामाजिक इतिहास वेगळा आहे , कारण राजकीय दृष्टया समाजाला दिलेली कोणतीच देणगी जशीच्या तशी समाजात रुजत नाही .ज्या अमेरिकन महिलांच्या पुढाकाराने महिला दिन सुरू झाला त्याच अमेरिकेत आजही महिला आणि पुरुषांना समान वेतन नाही , तिथे इतर देशांची काय कथा . समाज स्त्री कडे दुय्यम म्हणून पाहत आला आणि आजही तो तसाच पाहतो. आता तुम्ही म्हणाल असं कसं म्हणून चालेल ? आपण केवढे बदल आत्मसात करून घेतलेत. स्त्री दिवसेंदिवस प्रगती करत आहे . पण ती एका चौकटीत आहे मैत्रिणींनो. कसे ते तुम्हीच पाहा. काही दिवसांपूर्वीचे उदाहरण घेऊ. माननीय द्रौपदी मुर्मु देशाच्या सर्वोच्च पदावर विराजमान झाल्या, म्हणून तुम्ही असे म्हणाल का की आता आदिवासी महिला पुढील काळात समस्यामुक्त होऊन जगेल .याचाच अर्थ भारतात शेवटच्या घटकापर्यंत विकास साधलेला नाही . WEF (world economic forum) च्या एका ताज्या अहवालनुसार भारतात स्त्री -पुरुष समानता येण्यासाठी १३२ वर्ष लागतील .मग १३२ वर्ष नुसते स्टेटस ठेऊन महिला दीन साजरे करत बसायचे का ? या प्रश्नांना उत्तरे आहेत आणि ती आपल्याच हातात आहेत की हे १३२ वर्ष कमी कसे होतील .
आज स्कॅनडेनेवियन (५ देशांचा समूह) देशात आणि अनेक पुढारलेल्या पश्चिमेकडील देशात महिलांना मासिक पाळीत ४ दिवसांची पगारी रजा मंजूर आहे. २०२३ मध्ये आपल्या सुप्रीम कोर्टाने अशीच एक PIL फेटाळली, सुप्रीम कोर्टा च्या मते अशा प्रकारे रजा मंजूर केल्यास महिलांना नोकरीवर ठेवताना त्यांना ठेवायचे की नाही यावरून भेदभाव होईल जे आपल्या घटनेला अपेक्षित नाही. तसेच २०२२ च्याच एका केस मध्ये सुप्रीम कोर्टाने काही निकाल दिले त्यामध्ये वडिलांच्या संपत्तीत मुलींना समान हक्क , अविवाहीत मुलींना विशिष्ट कालावधी उलटून गेल्यावर अबॉर्शन करण्याचा हक्क , २०१९ साली ट्रीपल तलाक. हे सर्व निर्णय स्वागतार्ह आहेत पण ते वेळीच होऊ शकले नाहीत याची खंत आहे .
महिलांचा मंदिर प्रवेश हा मुद्दा आजही गाजतो आहे . केरळ मधील शबरिमाला मंदिर प्रवेशा संदर्भात धार्मिक हस्तक्षेपामुळे सुप्रीम कोर्टाकडून स्थागिती देण्यात आली. यासारख्या अनेक धार्मिक बाबीत महिलांना प्रवेश नाकारला जातो. महिलांना स्वातंत्र्य द्या ही गोष्ट मागावी का लागत आहे, याचा आम्हाला विसर पडला आहे . १०डिसेंबर १९४८ हा तो दिवस आहे ज्या दिवशी संयुक्त राष्ट्रांनी मानवी हक्कांचा जाहीरनामा स्वीकारला. ज्याच्या कलम २ नुसार प्रत्येक व्यक्ती जन्मतः स्वतंत्र आहे आणि कलम १२ नुसार त्या व्यक्तीला स्वतःचं जीवन स्वतःच्या पद्धतीने जगण्याचा हक्क आहे .मग आम्हाला ७५ वर्ष होऊनही प्रत्येक गोष्ट विचारावी का लागते ? मंदिरात प्रवेश करण्यासाठी कोणत्याही साधू , महंतला का विचारायचे आहे ? तुम्ही सर्व गोष्टी आहे अशा स्वीकारता म्हणून समाज जास्त बळकट होऊन तुमच्यावर अन्याय करत राहतो . कारण ना तुम्हाला मानवी हक्कांचा जाहीरनामा माहीत आहे ना तुम्हाला घटनेने दिलेले मूलभूत हक्क माहित आहेत ! एखाद्या सणाप्रमाने महिला दिन साजरा करायचा ,छान स्टेटस ठेवायचे. पुन्हा आहे तशी जिंदगी सुरु. मग नेक्स्ट महिला दिन अशी १०० वर्षे लोटली सख्यानो .
काही महिलांना मी चुकीच बोलत आहे असंही वाटू शकतं , कारण त्यांनी स्त्री स्वातंत्र्याचा चुकीचा अर्थबोध घेतलेला असतो. काही प्रमाणात तो असा असतो की त्यांना स्वतःला त्या ज्या घरात राहिल्या वाढल्या आणि ज्या घरात नांदत आहेत तिथे त्यांना काही प्रमाणात सुट मिळते जसे की हवी ती कपडे घाला, शॉपिंग, फिरणे आणि बऱ्याच गोष्टी . तर मैत्रिणींनो थोड थांबा , पहिली गोष्ट म्हणजे महिला दिन हा जागतिक पातळीवर चा आहे आपल्या घरापुरता मर्यादित नाही , दूसरी गोष्ट म्हणजे जेंडर गॅप कमी करणे हे दुसरं उद्दिष्ट आहे जे अजून साध्य होण्यास १३२ वर्ष लागणार आहेत , आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे वुमन एम्पॉवरमेंट म्हणजे पाहिजे ते कपडे घालणं वगैरे नसून ते स्त्रियांचा रोजच्या इकॉनॉमिक हालचालींमध्ये असलेला सहभाग आहे . आर्थिक घडामोडींमध्ये स्त्रियांचा सहभाग हा मानव विकास अहवालातील एक आयाम असून त्यामध्ये आपण खूप मागे आहोत असे संयुक राष्ट्राचे मत आहे तसेच शाश्वत विकास या संयुक्त राष्ट्राच्या २०१२ मधील १७ उद्दिष्टांपैकी १ उद्दिष्टं लैंगिक समानता हे आहे , जी आपणास २०३० पर्यंत साध्य करणे आहे.
जेंडरगॅप चा विचार केल्यास भारतामध्ये १००० मुलांमागे ९२९ मुली आहेत . महाराष्ट्रात २०११ च्या जनगणनेनुसार बाल लिंग गुणोत्तराचा विचार केल्यास १००० बालकांमागे ८६१ बालिका आहेत . ही तफावत फार मोठी आहे . आताच आपण सोलापूर जिल्ह्यात नवरदेवाचा जो मोर्चा पहिला तो या आधी निर्माण झालेल्या लिंग गुणोत्तराच्याच फरकाचा परिणाम होता. २००८ पासून संसदेत महिलांना राजकीय आरक्षण ५०% असावे हे विधेयक प्रलंबीत आहे . स्थानिक स्वराज्य संस्थेत 50%आरक्षण मंजूर केले पण बायको निवडून येते आणि नवरा कारभार पाहतो अशी त्या आरक्षणची गत आहे .
हे झाले सर्व स्त्री वर अन्याय होतो वगैरे . नाण्याच्या २ बाजू नेहमी तपासाव्या म्हणतात तस , पुरुषांवर स्त्री कडून अन्याय होण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे असे वर्तमापत्राद्वारे वाचनात आले होते .पण हे सहजासहजी पटत नाही , एक बातमी अशी देखील वाचनात आली की बिहार राज्यात पत्नी आणि आई च्या भांडणाला कंटाळून एका जिल्हाधिकाऱ्यांनी आत्महत्या केली . IPC कलम ४९७ हा व्याभिचाराचा गुन्हा सिद्ध झाल्यास फक्त पुरुषाला सजा होत असे आणि याचा फायदा घेत कित्येक स्त्रियांनी सुद्धा ४९७ चा गैरवापर केला आहे . त्याप्रमाणेच कलम ४९८अ ज्यानुसार महिलेचा मानसिक व शारीरिक छळ करण्यात आल्यास सासरच्या मंडळींना अटक करण्यात येत असे या कलमाचा सुद्धा सुप्रीम कोर्टाच्या इतिहासात खुप गैरवापर केला गेला. अगदी ताजी बातमी २०२२ ची आहे . अशावेळी तुम्ही काय म्हणाल
मी माझ्या जवळच्या पुरूष नातेवाईकांना जेव्हा विचारते की स्त्री स्वातंत्र्य , स्त्री - पुरूष समानता यावर त्यांची काय मत आहेत ? तर बऱ्याचदा त्यांची ही उत्तर आहेत की स्त्री स्वाभाविक रित्या भावनिक असल्याने बऱ्याचदा अमिषाला बळी पडणे , फसवले जाणे , सायबर क्राईम, या गोष्टी ओळखू शकतं नाही . काही वेळा ओळखून सुद्धा वाहवत जाते , ठामपणाचा अभाव , शिक्षणाचा अभाव , नात्यांमध्ये सूडबुद्धी ने वागणे या गोष्टींमुळे स्वतःची प्रगती स्वतःचं खुंटवण्यास कारणीभूत ठरते. इथेच मेख आहे १३२ वर्ष कमी करण्याची पुरूष मंडळी नी महिलांबाबत बनवून ठेवलेली मत खोडून काढता आली पाहिजेत त्यासाठी एकमेकींचा आदर करायला शिका . सासु नणंद ही नाती मैत्रीच्या दर्जावर आणण्याचा प्रयत्न करा . ठाम बना पटकन विश्वास ठेवणे बंद करा. स्वतःमध्ये बदल घडवण्याची धडपड चालू ठेवा
शेवटी स्त्री एक शक्ति आहे तिने त्या शक्ति चा चांगला वापर केला तर वामनराव पै म्हणतात तसे घराचा स्वर्ग बनवते आणि सूडबुद्धीने वागली तर त्याचं घराची राखरांगोळी करते . संपूर्ण पुरूषी पद्धतिने वागणे म्हणजे स्त्री स्वांतत्र्य नाही तर व. पू काळे म्हणतात तसे निसर्गाने स्त्री आणि पुरुष हे दोन वेगळे घटक निर्माण केले आहेत . त्यांच्याकडून निसर्गाला जस अपेक्षित आहे तस त्यांनी वर्तन करावे . स्त्री आणि पुरुषाला त्यांची त्यांची शक्ति निसर्गाने प्रदान केेली आहे त्याचा प्रत्येकाने योग्य वापर करावा.
शेवटी Nothing is perfect in life but atleast try to go near about perfect
mpsc.aratigawali@gmail.com
आरती गवळी
Copy with name @copyright claim